शेतक-यांची बँक आणि जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्वाचे केंद्र
लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतक-यांची आर्थिक वाहिनी समजली जाणारी ७ मजली अर्थात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सत्तेचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या ४२ वर्षांपासून या सात मजलीची जपणूक करण्याचे काम माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. या जिल्हा बँकेची निवडणूक सुरू असून गेल्या आठवडाभरात विरोधक या चांगल्या संस्थेवर बेछूट, निराधार आरोप करत आहेत. त्यामुळे लातूरकरांनी मोठ्या प्रमाणात विरोधकांना सवाल उपस्थित केले आहेत.
लातूर जिल्हा बँक चांगल्या नेतृत्वांमुळे चांगली सुरू आहे. लोकांच्या कल्याणासाठी बँकेच्या माध्यमातून लाखो शेतक-यांना मदत होत आहे. या बँकेमुळे जिल्हाभरात सहकार क्षेत्रातील साखर कारखाने उभे राहिले आहेत. यामागे सहकार क्षेत्रातील या नेत्यांनी बँकेसाठी खूप कष्ट मेहनत घेतली आहे. विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मागच्या पाच वर्षात बँकेला अधिक पुढे घेऊन जाण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर राज्यातील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या पहिल्या टॉप दोन, तीन बँकांत लातूर बँकेचा उल्लेख राज्यभर होत आहे. इतके चांगलं काम सुरू असताना निवडणूक काळात विरोधक बँकेबद्दल चुकीचे, बेछूट, निराधार आरोप करीत आहेत. त्यामुळे लातूरकर सरसावले आहेत. मतदार राजासुद्धा ही बँक चांगल्या पद्धतीने काम करणा-या मंडळीच्या पाठीमागे उभी आहे. पुढेही राहील, अशा खमक्या आवाजात ग्रामीण भागात सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत.
एकीकडे जिल्हा बँक सत्ताधारी पॅनल प्रमुख सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन धिरज विलासराव देशमुख हे जिल्हाभर बँकेच्या मागच्या पाच वर्षांत केलेल्या कार्याबद्दल माहिती देत आहेत. बँकेचा नफा, विविध योजना राबवून शेतक-यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करत असताना बँकेला अधिक नफा मिळावा, यासाठी त्यांनी व संचालक मंडळाच्या वतीने केलेले प्रयत्न, याबाबत लेखाजोगा मांडत आहेत तर दुसरीकडे विरोधक मात्र बँकेच्या कारभाराबद्दल चुकीच्या पद्धतीने आरोपांच्या पोस्ट करत जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नावर सामान्य नागरिक, सभासद, हितचिंतक यांनी विरोधकांना सवाल उपस्थित केला आहे. लातूरकर विरोधकांना विचारत आहेत, चांगले कार्यक्षम नेतृत्व दिलीपराव देशमुख यांच्याकडे आहे, चांगले कार्य करत आहेत, इथे राजकारण नको, चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, अशी चर्चा आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सभासद करीत आहेत.
















