ठाणे : प्रतिनिधी
उल्हासनगरमध्ये आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीचं दुस-या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला तरुणीच्या आईचा विरोध होता. मुलगी त्या तरुणासोबत पळून जाण्याच्या तयारीत असताना आईने मुलीची हत्या केली. या प्रकरणी उल्हासगनर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. या घटनेमुळे उल्हासनगर हादरले आहे. पोलिस सध्या पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प १ मधील भैय्यासाहेब आंबेडकर परिसरात ही घटना घडली. याठिकाणी राहणा-या १९ वर्षीय अमृता गरुडचे त्याच परिसरात राहणा-या दुस-या जातीतील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधला अमृताच्या आईचा विरोध होता. तिने अमृताला अनेकदा समजावण्याचा प्रयत्ने केला पण अमृता ऐकायला तयरा नव्हती.
याच कारणावरून रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अमृता आणि तिच्या आईचे वाद झाले. वादानंतर अमृता घर सोडून जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी रागाच्या भरात तिची आई आशा गरुडने ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी स्वत: उल्हासनगर पोलिस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अमृताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आशा गरुडविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली. आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
















