आरबीआयने दिली पायलट प्रोजेक्टला मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात लवकरच १० आणि २० रुपयांच्या प्लास्टिक(पॉलिमर) च्या नोटा पाहायला मिळू शकतात. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पॉलिमर नोटांच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. त्यानुसार १० आणि २० रुपयांच्या १००-१०० कोटी पॉलिमर नोटा चाचणीसाठी जारी केल्या जातील. ही चाचणी यशस्वी ठरल्यास पॉलिमर नोटा मोठ्या प्रमाणात जारी करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात यासंदर्भात माहिती दिली. आरबीआयच्या पॉलिमर नोटांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता फक्त हा एक पायलट प्रोजेक्ट आहे. भारतातील हवामान आणि परिस्थितीत प्लास्टिक नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात हे पाहिले जाणार आहे. लोकसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर बँक नोटांना मंजुरी दिली आहे. आरबीआयच्या मते पॉलिमर नोटा सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांच्या तुलनेत अधिक मजबूत आणि दीर्घकाळ टिकतात. काही देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरू आहे. त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत, भारतात त्याचा प्रायोगिक पातळीवर वापर सुरु होईल.
भारतीय रिझर्व बँकेने आपल्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीवरून रिझर्व्ह बँक अधिनियम १९३४ च्या कलम २५ अंतर्गत सरकारला १० आणि २० रुपये मूल्यवर्गाच्या प्रत्येकी एक अब्ज (१०० कोटी) पॉलिमर बँक नोटांच्या फील्ड ट्रायलसाठी आणि ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या मूल्यवर्गांमध्ये नियमितपणे पॉलिमर नोट्स जारी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली.
















