जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
नगर : प्रतिनिधी
राज्यातील ब-यांच धरणांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. परंतु मराठवाडा, विदर्भात दुष्काळाचे संकट भेडसावत आहे. अशा परिस्थिती धरणांतील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जलसंपदा विभागाने पिण्याच्या पाण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. राज्यात दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन लवकरच पिण्याचे नियोजन करण्यात येईल. राज्यातील सर्वच विभागांची माहिती संकलित झाल्यानंतर टंचाई परिस्थितीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
प्रवरानगर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. परंतु बरीच धरणे भरली आहेत. एल निनोचे संकट तीव्र होत आहे. पावसाने दडी मारल्याने संकट अधिक तीव्र होत असून, बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी त्यांनी गणरायाला दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी साकडे घातले.
मराठवाडा, विदर्भात चिंताजनक स्थिती आहे. परतीचा पाऊस किती प्रमाणात होतो, याचा अंदाज अद्याप नाही. राज्यातील सर्व परिस्तितीचा अंदाज घेऊन मदत व पुनर्वसन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या आकडेवारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसमावेशक निर्णय घेतील, असे विखे पाटील म्हणाले.
















