चारठाणा : महिला सरपंचाच्या अंगावर धावत जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी जिंतूर तालुक्यातील कोठातांडा येथील २ जणांवर चारठाणा पोलीस ठाण्यात दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात कोठातांडा येथील महिला सरपंच आशामती संतोष पवार यांनी फिर्याद दिली आहे. या फियार्दीत नमूद करण्यात आले आहे की, त्या व त्यांच्या जाऊ मिराबाई नामदेव पवार या दोघी शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास शेतात जात असतांना गावातील गणपती मंदीराजवळील रस्त्यावर मारोती गणपत चव्हाण व रवी संतोष चव्हाण या दोघांनी आपणास सही द्या असे म्हणत अंगावर धावत येऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सरपंच आशामती पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संबंधीन २ जणांवर शनिवारी रात्री चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोठातांडा येथील घटनेमुळे संपूर्ण गावात व परिसरात खळबळ उडाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार कालवने हे अधिक तपास करीत आहेत.















