विक्रमी वेळेत निकाल, २९ जूनला शिक्षा सुनावणार
पुणे : प्रतिनिधी
नसरापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणा-या नराधम भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. या प्रकरणी विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करून खटल्याची विक्रमी वेळेत सुनावणी झाली. आज न्यायमूर्तींनी भीमराव कांबळे दोषी असल्याचा निकाल दिला. त्याच्यावरील सर्व गुन्हे सिद्ध झाले असून, २ गुन्ह्यांत फाशीच्या शिक्षेची तरतूद, एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेप तर एका गुन्ह्यात १४ वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. आता या प्रकरणी २९ जून रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. एका चार वर्षांच्या बालिकेसोबत झालेल्या या अमानुष कृत्यामुळे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये आणि त्याला थेट फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आक्रमक मागणी नागरिक, महिला संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी लावून धरली होती. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांत हे प्रकरण न्यायालयासमोर नेत आरोपीला फाशीपर्यंत नेण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी नराधम भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंतर त्याला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. त्यानंतर या नराधमाला न्यायाधीशांनी विचारले की, तुला हा संपूर्ण प्रसंग आठवतो का, आता तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायची? त्यावर भीमराव कांबळेने आरोप फेटाळले. यावर न्यायाधीशांनी आता तू जे सांगत आहेस तो इतिहास झाला. कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी. न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भीमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. न्यायाधीश म्हणाले की, ही घटना समाजासाठी घातक आहे. त्या दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झाले आहेत. परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदार यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध झाला. दरम्यान, आता न्यायालय २९ जून रोजी नराधमाला शिक्षा सुनावणार आहे.
आरोपीला फाशीची
शिक्षा देणेच योग्य
आरोपीच्या आधीच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता तो कोणत्याही परिस्थितीत सुधारू शकत नाही. त्यामुळे फक्त फाशी हीच या आरोपीला योग्य राहील, असे सरकारी वकील म्हणाले. आरोपीच्या वकिलांनी या गुन्ह्यातील घटनांची संगती लगत नसल्याचा युक्तीवाद केला. त्याचबरोबर आरÞोपीच्या वकिलांनी तो स्वत: या घटनेमुळे धक्क्यात असल्याचा युक्तीवाद केला आणि जन्मठेप योग्य शिक्षा राहील, असा दावा केला.
















