जिल्हाधिका-यांचा अहवाल, आमदार मेहता गोत्यात!
मिरा-भाईंदर : प्रतिनिधी
मिरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि अनियमितता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यासंबंधीचा चौकशी अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केला असून, यामध्ये भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने मौजे वरसावे येथील विविध गट क्रमांकांवरील जमिनींच्या व्यवहारांची सखोल कागदपत्रे तपासली. या अधिकृत चौकशी अहवालात आदिवासी जमिनींचे बेकायदा हस्तांतरण, जमीन व्यवहारातील मोठी अनियमितता आणि महसूल अभिलेखांमधील (रेकॉर्ड) गंभीर त्रुटींवर थेट बोट ठेवण्यात आले आहे. तक्रारदारांच्या जमिनी आदिवासींकडून बिगर आदिवासी व्यक्ती आणि कंपन्यांकडे बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आदिवासींची जमीन
बळकावल्याचा आरोप
मिरा रोडच्या काशिमीरा पट्टयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या वरसावे गावातील जुन्या आदिवासी पाड्यांमधील हा प्रकार आहे. येथील मूळ आदिवासी जमीनधारकांनी त्यांच्या जमिनी बेकायदा बळकावल्याची तक्रार केली होती. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह संबंधितांकडून जमिनीचा कब्जा केला होता.
















