लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील काही खासगी सीबीएसई व सेमी-इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक पात्रता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप संभाजी सेना विद्यार्थी आघाडीने केला आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर दि. १३ जुलैपासून शिक्षण विभागासमोर ढोल बजाओ आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संभाजी सेनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत शिक्षकांची शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली असतानाही काही शाळांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून त्यांच्या बौद्धिक विकासालाही बाधा पोहोचत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असून पालकांची दिशाभूल केली जात आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या हिताला दुय्यम स्थान देत आर्थिक फायद्यासाठी नियमबा नियुक्त्या केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वी ४ मार्च आणि १६ एप्रिल रोजी शिक्षण विभागाकडे निवेदने सादर करण्यात आली होती. तसेच ३० एप्रिल पर्यंत कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नसल्याने संभाजी सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शैक्षणिक अहर्ता नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती करणा-या शाळा व्यवस्थापनांवर आणि संबंधित संस्थाचालकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १३ जुलै रोजी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी सेना विद्यार्थी आघाडीने दिला आहे. यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कांदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रितेश चव्हाण, अध्यक्ष वैभव विभुते, लातूर तालुकाध्यक्ष निखिल जगताप, औसा तालुकाध्यक्ष अक्षय पवार, रेनापुर तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, गुरू पाटील, सुजल सुडे, माऊली गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
















