लातूर : प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरी लातूर जिल्हयात अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. जळकोट तालुका वगळता इतर तालुक्यात अद्याप फारसा पाऊस दिसून येत नाही. त्यामुळे जिल्हयात आजपर्यंत ०.०३ टक्के म्हणजेच १ हजार ६७६ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. जिल्हयात गेल्या चार दिवसापासून पावसाळी वातावरण तयार होऊन पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र खरीपाच्या पेरणी योग्य पाऊस अद्याप जिल्हयात झाला नसल्याने शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
गेल्यावर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यावर्षी मान्सूनच्या पावसाला नुकतीच सुरूवात झाली आहे. जिल्हयात जळकोट तालुक्यात चांगला पाऊस झाला, तर इतर तालुक्यात अद्याप दमदार पावसाची वाट शेतकरी पाहत आहेत. जिल्हयात आज पर्यंत ६०.२ मिली मिटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्यानुसार १ हजार ६७६ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात ९३९ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. २०५ हेक्टरवर तूर, ४१ हेक्टरवर मूग, १७ हेक्टरवर उडीद, ३ हेक्टरवर ज्वारी, १ हेक्टरवर मका, तर कापसाची ४७० हेक्टरवर लागवड झाली आहे.
जळकोट तालुक्यात सर्वाधिक पाऊस
खरीपाचा पेरा होण्यासाठी जिल्हयात दमदार पावसाची गरज आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने खरीप हंगामाच्या पेरीणीचे नियोजनच बिघडत आहे. जिल्हयात आजपर्यंत ६०.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात १८८.२ मिलीमिटर पाऊस पडला आहे. लातूर तालुक्यात ५५.४ मिलीमिटर, औसा तालुक्यात ५३.५ मिलीमिटर, अहमदपूर तालुक्यात ७०.३ मिलीमिटर, निलंगा तालुक्यात ५८.७ मिलीमिटर, उदगीर तालुक्यात ६९.३ मिलीमिटर, चाकूर तालुक्यात २५.१ मिलीमिटर, रेणापूर तालुक्यात ६९.१ मिलीमिटर, देवणी तालुक्यात ४४.८ मिलीमिटर, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ३८.२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
लातूर, शिरूर अनंतपाळ, चाकूर तालुक्यांत शून्य पेरा
जिल्ह्यात १ हजार ६७६ हेक्टरवर पेरा झाला आहे. यात जळकोट तालुक्यात १ हजार ५६२ हेक्टरवर पेरा झाला आहे. तर उदगीर तालुक्यात ५५ हेक्टर, अहमदपूर तालुक्यात २४ हेक्टर, रेणापूर व निलंगा तालुक्यात प्रत्येकी ५ हेक्टर, देवणी तालुक्यात ४ हेक्टर, औसा तालुक्यात १ हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालानुसार समोर आले आहे. तर लातूर, शिरूर अनंतपाळ व चाकूर तालुक्यात अद्याप पेरणी योग्य पाऊस झाल्याने या तालुक्यात अद्याप पेरणीस सुरूवात झाली नाही. जिल्हयातील सर्व तालुक्यात पेरण्या होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
















