सिमला : वृत्तसंस्था
आयपीएल २०२६ च्या ५५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सवर ३ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सुरुवातीच्या ७ सामन्यात अजिंक्य राहिलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सला आता सलग चौथ्या पराभवाचा धक्का बसला.
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २१० धावांचा डोंगरा उभा केला. मात्र, इतकी मोठी धावसंख्या उभारूनही पंजाबच्या नशिबात पराभवच होता. दिल्लीसाठी शेवटच्या षटकांमध्ये आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी फिनिशरची भूमिका बजावत अवघ्या १९ षटकांतच लक्ष्य पूर्ण केले. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. प्रियांश आर्या (५६ धावा) आणि प्रभसिमरन सिंग (१८ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची स्फोटक भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीचा विजय सुकर झाला.
















