पुणे : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी आज मंगळवारी (ता. २९ जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.
पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी (ता. २६ जुलै) रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पण या प्रकरणावरून आता एकनाथ खडसे यांनी आज मंगळवारी (ता. २९ जुलै) पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी संपूर्ण कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, २७ जुलै रोजी सकाळी पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला आणि एकनाथ खडसेंच्या जावयांना अटक केल्याची बातमी तुम्हाला सर्वांना माहिती असेल. माझ्या मनात पुणे पोलिसांच्या कारवाईविषयी प्रश्न आहेत. सात जणांची पार्टी सुरू होती. तिथे संगीत नाही, डान्स नाही, फक्त सात जण एका घरात बसले आहेत. त्याला रेव्ह पार्टी म्हणता येईल का? याला जर रेव्ह पार्टी म्हणायचे असेल तर राज्यात कुठेही कोणीही घरात पाच-सात जण पार्टीला बसले तर त्याला रेव्ह पार्टी म्हणावे लागेल. मला पोलिसांना रेव्ह पार्टीची व्याख्या विचारायची आहे. रेव्ह पार्टी सांगून पोलिसांनी बदनामी करण्याचे काय प्रयोजन होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.
तसेच, या प्रकरणात पोलिसांनी जी कारवाई केली, त्यावेळी व्हीडीओ सर्वांना दाखवले. पोलिसांना एखाद्याच्या खासगी आयुष्यातील व्हीडीओ दाखवण्याचा कोणता अधिकार आहे? पोलिसांनी केवळ बदनामी करण्यासाठी हे कृत्य केले आहे. पोलिसांना अशाप्रकारे कोणाचेही चेहरे, विशेषत: महिलांचे चेहरे दाखवण्याचा अजिबात अधिकार नाही. मात्र, पोलिसांनी पुरुष आणि महिलांचे फोटो दाखवून त्यांची बदनामी केली. तसेच प्रांजल खेवलकर यांना एक नंबरचा आरोपी करण्याचे कारण काय, असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.
तर, प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत. ते वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. ज्याठिकाणी पोलिसांनी अमली पदार्थांचा साठा सापडला तो एका मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे पोलिसांच्या व्हीडीओत दिसत आहे. त्या मुलीलाही हे माहिती नाही, असे ती म्हणत आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी तिला पहिल्या क्रमांकाची आरोपी करायला पाहिजे होते. प्रांजल खेवलकर आणि इतरांनी कोणताही अमली पदार्थ बाळगला नव्हता. मग तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करून पोलिसांनी इतरांना साक्षीदार केले पाहिजे होते. मात्र, पोलिसांनी प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केले? असा सवाल उपस्थित करत खडसेंनी हे कुटुंबाला बदनाम करण्याचे कृत्य असल्याचे म्हटले आहे.