मुंबई : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून २५ मे रोजी कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धाडी आणि तपासणी मोहिमेचा धडाका लावला आहे. या कारवाईसोबतच त्यांनी अनेक मोठे निर्णय देखील घेतले आहेत. आता मुंबईच्या उपनगरातील प्रसिद्ध खाद्य दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. मुलुंडमधील प्रसिद्ध चाट विक्री केंद्र ‘गुप्ता चणा भंडार’वर एफडीएने धाड टाकत दुकान सील केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मुलुंड पश्चिमेतील डम्पिंग रोड, गौतम नगर परिसरात असलेल्या ‘गुप्ता चणा भंडार’ येथे एफडीएच्या पथकाने छापेमारी केली. तपासणीदरम्यान दुकानात गंभीर स्वरूपाच्या नियमभंगाच्या घटना आढळून आल्या. त्यामुळे संबंधित आस्थापनाविरोधात तातडीची कारवाई करत ‘स्टॉप बिझनेस नोटीस’ बजावण्यात आली असून दुकानाचा व्यवसाय तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
एफडीएच्या अधिका-यांना तपासणीदरम्यान अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्यास अपायकारक परिस्थिती आढळली. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, उत्पादन दिनांक आणि मुदत संपण्याची तारीख नमूद नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर कारवाई करत एकूण ११४.२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. जप्त मालामध्ये ६८ किलो भाजलेला चणा, १९.५ किलो बारीक शेव, १८ किलो मुरमुरे, ५.२ किलो पाणीपुरीच्या पु-या आणि ३ किलो शेवपुरीच्या पु-यांचा समावेश आहे. या मालाची अंदाजे किंमत ८,२९० रुपये असल्याचे एफडीएने सांगितले.
याशिवाय, संशयास्पद रंग वापरून तयार करण्यात आलेल्या हिरव्या वाटाण्यांचाही साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
















