मुंबई : प्रतिनिधी
मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या मराठमोळ्या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया गुरवने वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
अभिनेत्री अक्षया गुरवने २०१७ मध्ये भूषण वाणीसोबत लग्नगाठ बांधली. नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की, जवळपास ८ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मुलाखतीत अक्षया गुरवने सांगितल्याप्रमाणे, जेव्हा पहिल्यांदा ही बातमी समोर आली तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मला हे सर्व आवडले नाही. पण ही गोष्ट खरी आहे…मात्र आजही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करतो. पुढे-मागे जर अशी वेळ आली, तर एकत्र काम करायला मला आणि त्यालाही आवडेल.
प्रेमाबद्दल बोलताना अक्षया म्हणाली की, प्रेमात माणसाने नेहमी नि:स्वार्थी असावे…त्यामुळे कोणाला आपल्या आयुष्यातून निघून जायचे असेल तर जाऊ द्यावे. त्याला थांबवण्यात काहीही अर्थ नाही. मैत्री असो, कुटुंब असो किंवा नवरा-बायकोचे नाते.
आयुष्याला नवीन संधी देण्याबद्दल अभिनेत्री म्हणाली, एखादे नाते बिघडले म्हणून तुमच्या आयुष्यात पुन्हा तेच होईल असे नाही. माझा लग्न संस्थेवर अजूनही विश्वास आहे. मला एक मुलगी हवी आहे. मला संसार करायचा आहे. आयुष्यात मला अशी व्यक्ती हवी आहे जिला मी सर्व सांगू शकते. आयुष्यात एखादी गोष्ट घडून गेली म्हणजे परत तेच होईल असे नाही. मी आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहते.
















