छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे बहिरेपणाचे रुग्ण तब्बल दहा टक्क्यांनी वाढले आहेत. या दिवसांत धुरामुळे शहरात वायुप्रदूषण होऊन अनेकांना अॅलर्जी, सर्दी, खोकला, डोकेदुखी आणि कानदुखीचा त्रासही वाढला आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. अशा रुग्णांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढली होती. आताही अनेकांवर औषधोपचार सुरू असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
दरवर्षी दिवाळीत फटाके फोडूनच आनंदोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सवाच्या या चार दिवसांत धूर सोडणा-या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषण वाढते. यंदाही दिवाळीत कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन वायुप्रदूषण वाढल्याने सर्वाधिक त्रास दम्याच्या रुग्णांना झाला. त्यांचा श्वास कोंडला गेल्याने उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
श्वसनविकार, दमा, अलर्जी, खोकल्याचा आजार बळावून ही संख्या २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढली. तर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे आधीच कमी ऐकू येणा-यांसह या दिवसात श्रवणशक्ती कमी झालेल्यांची संख्या ५ ते १० टक्क्यांनी वाढली. यापैकी निम्मे रुग्ण औषधोपचाराने बरे झाले. मात्र, निम्म्या रुग्णांना आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार, असे रुग्ण येत राहतील, असेही डॉक्टरांनी सांगितले. दिवाळीत पर्यावरणपूरक फटाके फोडावे, मास्क वापरावा, फटाक्यांच्या धुरापासून लांब राहावे, मुलांनाही दूर ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
फटाक्यांमुळे इअर लॉसच्या रुग्णांत वाढ –
फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी झालेल्या रुग्णांची संख्या ५ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. आधीपासून श्रवणशक्ती कमी असलेल्यांचा त्रास वाढला. कानात सुऽई आवाज येणे, कानदुखीसह इअर लॉसच्या अनेक रुग्णांवर अद्यापही औषधोपचार सुरू आहेत.
अॅलर्जी, सर्दी, खोकला, डोकेदुखीचा त्रास –
दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण वाढून अॅलर्जी, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीच्या रुग्णांची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. सर्वच ईएनटी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होती. २० टक्के रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत.

