24.4 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeमहाराष्ट्रबसस्थानक, आगारांचा होणार पुनर्विकास

बसस्थानक, आगारांचा होणार पुनर्विकास

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय प्रवाशांना मिळणार विविध सुविधा

मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळाने आपल्या बसस्थानक आणि आगारांचा खाजगी माध्यमातून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एसटी बसस्थानके आणि आगार विमानतळासारखी चकाचक, हायफाय होणार आहेत.

या संदर्भात एसटी महामंडळाने पीपीपीमधून बस स्थानक आणि आगारांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या एसटी महामंडळाने निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगार आणि बसस्थानकांत प्रवाशांना विविध सुविधा देण्यात येणार आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळ तोट्यात असल्याने एसटी प्रवासी उत्पन्न वाढविण्याबरोबरच अन्य मार्गातून देखील उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे राज्यभरात तब्बल २५२ आगार आहेत. या आगार आणि बसस्थानकांतील जागांचा पीपीपी अर्थात पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपमधून पुनर्विकास केला जाणार आहे. यात एसटीच्या जागा खाजगी कंपन्यांना भाडेतत्वावर देऊन एसटीला उत्पन्न मिळावे असा प्रयत्न केला जाणार आहे.

त्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानक आणि आगारात विमानतळासारखे हायफाय वातावरण आणि शॉपिंग देखील करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १९ बसस्थानके आणि आगारांचा पुनर्विकास करण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहे. एसटीला ग्रामीण भागात पर्याय नाही. एसटीची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांपासून ते थेट नगरे-महानगरांपर्यंत जोडलेली आहे. आता एसटीत लवकरच अशोक लेलँडच्या साध्या डीझेलवरील दोन हजार गाड्या दाखल होणार आहेत. त्यातच आता १९ बसस्थानके आणि आगारांचा पुनर्विकास होणार असल्याने एसटी प्रवाशांना पुन्हा चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे.

या बसस्थानकांचा होणार कायापालट
पुण्यातील लोणावळा बसस्थानक, कोल्हापुरातील ताराबाई पार्क (जुनी विभागीय कार्यशाळा) आणि पन्हाळा (खुली जागा), जळगाव येथील शहर बसस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, विभागीय कार्यशाळा आणि मुक्ताई नगर आगार, नगर येथील पारनेर बसस्थानक, लातूर (शिवाजी चौक), बीडचे बसस्थानक, निवासी सदनिका आणि माजलगाव बसस्थानक, नांदेडचे हदगाव बसस्थानक, धाराशिव आणि कळंब बसस्थानक, अकोलाचे रिसोड बसस्थानक आणि वाशिम बसस्थानक, अमरावतीचे चांदूरबाजार बसस्थानक, यवतमाळचे पुसद बसस्थानक, भंडा-याचे बसस्थानक, नागपूरचे हिंगणा बसस्थानक, ठाण्याचे वाडा आगार यांचा पीपीपी माध्यमातून पुनर्विकास होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR