Homeलातूरलातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण यांची मुरूड ग्रामीण रुग्णालयास भेट 

लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण यांची मुरूड ग्रामीण रुग्णालयास भेट 

लातूर : प्रतिनिधी
लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर पंचायत समितीचे उपसभापती महेश चव्हाण यांनी मुरुड ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन चार दिवसांपूर्वी घडलेल्या १०८ अ‍ॅम्बुलन्स अपघाताची सखोल पाहणी व आढावा घेतला.
या घटनेदरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता व धाडस अत्यंत कौतुकास्पद आहे. अ‍ॅम्बुलन्समध्ये विजेचा शॉक लागलेला रुग्ण असताना मोठी दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाधान गायकवाड, मुकेश सव्वाशे, सुरज कांबळे यांनी प्रसंगावधान राखत रुग्णाला तात्काळ बाहेर काढून दुस-या वाहनातून सुरक्षितपणे जिल्हा रुग्णालय, लातूर येथे हलवले. त्यांच्या या कार्यामुळे मोठा अनर्थ टळला. याबद्दल युवक काँग्रेस पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. दिनेश नवगिरे, मुरुड शहराध्यक्ष दीपक पठाडे, कार्याध्यक्ष निलेश फेरे, चैतन्य पठाडे उपस्थित होते. दरम्यान, रुग्णालयात १०२ सेवा व आमदार निधीतून उपलब्ध असलेल्या अ‍ॅम्बुलन्स या केवळ ड्रायव्हर अभावी उभ्या असल्याचे गंभीर वास्तव समोर आले. परिणामी १०८ अ‍ॅम्बुलन्सवर अनावश्यक ताण पडत असून, साध्या रुग्णांनाही त्याच अ‍ॅम्बुलन्समधून जिल्हा रुग्णालयात हलवले जात आहे. अशा परिस्थितीत एखादा गंभीर रुग्ण आल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
त्याचबरोबर उपसभापती चव्हाण यांनी जिल्हा परिषद शाळा, पारू नगर येथेही भेट देऊन शाळेची पटसंख्या, वर्गखोल्यांची उपलब्धता व सुरू असलेले आवश्यक बांधकाम यासंदर्भात चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. आरोग्य व शिक्षण या दोन्ही मूलभूत क्षेत्रांतील त्रुटी या सर्वसामान्य जनतेच्या हिताशी निगडित आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR