मुंबई : प्रतिनिधी
रिअॅलिटी शो विश्वातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित शो ‘बिग बॉस २०’चा ग्रँड प्रीमियर ६ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानने या मैलाचा दगड ठरणा-या २०व्या सीझनमध्ये मनोरंजन, क्रीडा, संगीत आणि डिजिटल जगतातील तब्बल १७ स्पर्धकांचे घरात स्वागत केले.
चित्रपटसृष्टीतील आपली ३८ वर्षे साजरी करत सलमान खानने आपल्या २० आयकॉनिक गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स देत शोची सुरुवात केली. या ग्रँड प्रीमियरला भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आणि मनोज तिवारी यांनीही खास उपस्थिती लावून रंगत वाढवली. मनोज तिवारी यांची मुलगी रीति तिवारी यंदा स्पर्धक म्हणून घरात दाखल झाली आहे.
भारताची दिग्गज ऑलिम्पियन बॉक्सर एम. सी. मॅरी कॉम हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने विशेष व्हिडिओ मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर भोजपुरी क्वीन आम्रपाली दुबे, टीव्ही अभिनेत्री माही विज, कनिका मान, उदिति सिंह, ईशा रिखी आणि आसिफ खान (पंचायत फेम) यांसारखे प्रस्थापित चेहरे घरात दाखल झाले आहेत. तरुणाईचे प्रतिनिधित्व करत अरिश्फा खान, अमन गांधी, लव्ह गिल, रोहेद खान, गायक काझी अहमद तौकीर, रॅपर हर्ष मचारे , गेमिंग स्टार तन्मय सिंह आणि कुशल तंवर (गुल्लू) हेदेखील या स्पर्धेत उतरले आहेत.
‘वरदान’ थीम आणि ‘एक्स्ट्रा जीवन दान’चा ट्विस्ट
यंदा ‘बिग बॉस २०’ची थीम ‘वरदान’ ही ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेअंतर्गत स्पर्धकांना ‘एक्स्ट्रा जीवन दान’ (दोन लाईफलाईन्स) मिळणार असून, त्यामुळे खेळात कोणत्याही क्षणी अनपेक्षित वळण येऊ शकते. ‘जिओ हॉटस्टार’ आणि ‘कलर्स टीव्ही’वर सुरू झालेल्या या सीझनमध्ये आता कोणते नवे वाद आणि मैत्रीचे बंध पाहायला मिळतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
















