35.1 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रबेरीज-वजाबाकीचे गणित कोणाला तारणार, कोणाला भोवणार ?

बेरीज-वजाबाकीचे गणित कोणाला तारणार, कोणाला भोवणार ?

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदार संघात निवडणुकीचा तोंडावर पक्षांतराची रेलचेल झाली. त्यात या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात राजकीय पदाधिका-यांनी उड्या मारल्या. पक्षात होते तोपर्यंत त्या पक्षाचे निष्ठावान आपणच म्हणवून घेणारे निष्ठा वगैरे बाजूला ठेवत व स्वहित जोपासत दुस-या पक्षात सामील झाले. हे पक्षांतराचे प्लस -मायनसचे गणित मात्र काही जणांना बेरजेचे ठरणार असल्याचे चित्र असले तरी ते कोणाला तारणार व कोणाला भोवणार हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

२०१९ च्या निवडणुकीनंतर शिरपूरचे नेते अमरिशभाई पटेल यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. ते विधानपरिषदेचे आमदारही झाले. त्यांना साधारण तीन वर्ष होत आले. त्यामुळे काँॅग्रेसला धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने मोठे खिंडार पडले होते. त्यानंतर मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होत टॉपटेन खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र तथा जि.प.माजी अध्यक्ष भरत गावित हेदेखील कॉंग्रेस सोडत भाजपवासी झाले.

शहाद्याचे नेते दीपक पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपवासी झाले होते. तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांनी कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झाले. त्यांच्यामुळेही कॉंग्रेसला धक्का बसला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी भाजपत प्रवेश करीत कॉंग्रेसला धक्का दिला. कॉंग्रेसचे अनेक वर्ष तळोदा विधानसभेचे ते उमेदवार होते.

काँग्रेसने त्यांना मंत्रीपदही दिले होते. जिल्ह्यातील ज्येष्ठ व प्रमुख नेते होते. आगामी विधानसभा निवडणुकीतही ते उमेदवार निश्­चित होते. मात्र त्यांची लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, अशी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे अपेक्षा होती. आपल्याला नाही तर किमान त्यांची कन्या तथा जि.प. च्या माजी अध्यक्षा सीमा वळवी-नाईक यांना मिळावी असा पर्याय ठेवला होता.

मात्र पक्षीयस्तरावर अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या नावाला प्राधान्य असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शेवटी नाराजीतून पक्षांतराचा निर्णय घेतला असावा. ज्यादिवशी काँग्रेसचे नेते राहूल गांधी नंदुरबारमध्ये भारत जोडो यात्रेच्या सभेला संबोधित करीत होते. त्यावेळी अ‍ॅड. वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे एकंदरीतच कॉंग्रेसमधील बडे नेते काँँग्रेसला खिंडार पाडून भाजपमध्ये दाखल झाले.

त्यामुळे कॉंग्रेसची ताकद कमी झाली तर भाजपची ताकद वाढली असे चित्र आहे. मात्र कॉंग्रेसमधील हे जुने -जाणते नेते गेल्याने त्यांच्या जागी नवीन पिढीला चालना मिळाली, संधी मिळाली. त्यांनी पक्षाच्या कामात झोकून घेतले आहे. यात कॉंग्रेसचे मायनस झालेले नेते भाजपमध्ये प्लस झाले. तर दुसरीकडे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही साधारण साडेतीन वर्षापूर्वी कॉंग्रेस सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र शिवसेनेतही दोन गट पडल्याने त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला. ते आता शिंदे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी ठाकरे गट सोडला मात्र त्यांच्यासोबत असलेले आमशा पाडवी यांना विधानपरिषदेच्या आमदारकी उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे पाडवी आमदार झाले. ते ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र ठाकरे गटाचा आमदार आमशा पाडवी यांनी अचानक एका रात्रीतून आपली निष्ठा गुंडाळून ठेवत थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे ठाकरे सेनेतून मायनस होत ते शिंदे सेनेत प्लस झाले. मात्र माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नाराज झाले. या नेत्यांच्या पक्षांतरासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांच्यासोबत गेले. तर काँग्रेसचा जि.प.सदस्या हेमलता शितोळे यांनी जि.प. अध्यक्षपदाचा निवडीच्या वेळेस भाजपला साथ दिली.त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे युवा नेते सुहास नाईक यांनीही तेच केले. त्यामुळे जि.प.वरील सत्ता भाजपकडे आली.

असे करूनही ते काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत होते. शेवटी आता शितोळे या भाजपचे काम करीत आहेत. तर जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक कॉंग्रेसचे काम करीत आहेत.कारण त्यांना तळोदा विधानसभा मतदार संघातून उमेदवारीची आस आहे. त्याचप्रमाणे भाजपचे मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे निकटवर्तीय असलेले शहाद्याचे युवा नेते अभिजित पाटील, सारंगखेड्याचे जयपाल रावल हे काही कारणास्तव दुरावले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR