लातूर : प्रतिनिधी
राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत अव्वल स्थानी असलेल्या लातूरच्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी-२०२६ विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याने गेल्या ३ वर्षात १०० टक्के उसाची तोड केवळ हार्वेस्टरद्वारे होत असून याचे जनक व कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडे जाते देशभरात केवळ मांजरा साखर कारखाना १०० टक्के हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणारा पहिला कारखाना ठरलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने राज्यभरातून मांजरा साखर कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने ७१ व्या वार्षिक परिषद व साखर एक्सपो २०२६ इंडिया या कार्यक्रमांमध्ये दि. ८ ऑगस्ट रोजी हॉटेल जे. डब्ल्यू. मेरीयट पुणे येथे मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराचे शानदार सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे .
साखर उद्योगाकडे मजुरांची कमतरता व उसाचे क्षेत्र अधिक झाल्याने मे महिन्यापर्यंत चालू ठेवावे लागत असे. कधी ऊस तोड कामगार मध्येच निघून जायचे त्यामुळे कारखान्यास उसाचे गाळप उशिरा होऊ लागले. त्यानंतर माजी मंत्री सहकार, महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मदतीने ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर देण्यात आले. त्यात तोडणी यशस्वी झाली ऊस उत्पादक शेतक-यांची ऊस तोड लवकर होऊ लागली. त्यानंतर जिल्हा बँकेकडून बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी शेतक-यांना हार्वेस्टर कर्ज योजना सुरू केली.
त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतक-यांनी स्वत: बँकेकडून कर्ज काढून हार्वेस्टर खरेदी केले. त्यातुन बहुतांश हार्वेस्टर साखर कारखान्याला भाड्याने लावली. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याची स्वत: ची २५ हार्वेस्टर व कारखान्याने हमीवर दिलेले ५५ हार्वेस्टर, असे एकूण ८० हार्वेस्टरद्वारे १०० टक्के ऊस तोडणी आत्ताच झालेल्या गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये झालेली आहे. त्यामुळे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर हा देशात १०० टक्के ऊस तोडणी हार्वेस्टरद्वारे होणारा केवळ राज्यातील नाही तर देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.
















