लातूर : एजाज शेख
पाणीटंचाई आणि त्यातच नळाला येणारे अशुद्ध पाणी याला पर्याय म्हणून नागरिक जारच्या पाण्याकडे वळले. हे जरी खरे असले तरी आज लातूर जिल्ह्यामध्ये ‘जार संस्कृती’ने चांगलेच पाय रोवले आहेत. जिल्ह्यात हजारो प्लांट्सच्या माध्यमातून शुद्ध पाण्याचा अशुद्ध उद्योग सूरु आहे. जार संस्कृती नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे खेडोपाडी, गल्लोेगल्ली शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचे उद्योग सुरु आहेत. शुद्ध पाण्याच्या नावावर सुरु असलेला हा गोरखधंदा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून चक्क ग्रामपंचायतीपासून ते मोठ्या शहरांतील गल्लीबोळात वैयक्तिक वॉटर फिल्टर प्लाट्स उभारणीचे पेव फुटले आहे. त्याचबरोबर गल्लोगल्ली प्लांट टाकुन पैसे कमावण्याचा एक मार्ग झाला आहे. परंतु, शुद्धतेच्या नावावर विक्री होणारे जारचे पाणी खरच शुद्ध आहे काय?, हे तपासणारी यंत्रणाच कार्यरत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाला बाटलीबंद पाण्यापुरते अधिकारी असल्याने त्यांच्याकडून हात वर केले जातात. शुद्ध आणि थंड पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन प्लांंट्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. बहुतांश युनिट्स चक्क घरगुती वीज मीटरवर चालवून व्यावसायिक नफा मिळवत आहेत.
अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या डोळ्यादेखत हा बेकायदेशीर कारभार सुरु आहे. पाणी ‘शुद्ध’ असल्याचे समजून नागरिक ते विकत घेतात, मात्र त्यातील आवश्यक नैसर्गिक खनिजे नष्ट करुन जनतेला ‘निर्जीव’ पाणी पाजले जात आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात पोटाचे विकार आणि किडनीच्या समस्या डोके वर काढत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला का अशुद्ध खेळ वेळीच थांबवून त्यावर नियंत्रण ठेवणारी, शुद्धता तपासणारी यंत्रणा शासनाने उभी करणे गरजेचे आहे.
















