सोलापूर/ ऍड. डॉ. विजयसिंह जाधव : सोलापुरात रविवार दि. ३ मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास भर चौकात रस्त्यावर एका तरुणाची निर्र्घृण हत्या केल्याची घटना घडली. ५ वर्षापूर्वी वराह पालनाच्या व्यवसायात भांडण झाली होती, त्याबाबतची सुनावणी कोर्टात सुरू आहे. याचाच राग मनात धरून रविवारी सोलापूर शहरातील माधव नगर येथील मुख्य रस्त्यावर लाठ्या-काठ्या धारदार शस्त्र आणि दगडाने ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आली.
दरम्यान १ मे ते ३ मे या तीन दिवसांत जिल्ह्यात ६ जणांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून सलग होणा-या खुनांच्या मालिकेने कायदा-सुव्यवस्थेची ‘हत्या’ झाल्याचे भासवत आहे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या काळात चोख बंदोबस्तामुळे शांत असलेला सोलापूर जिल्हा पुन्हा गुन्हेगारांच्या कारवायांनी हादरला आहे.
मारहाण करताना, तोंडावर दगडाने ठेचून मारतानाचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुरेश कृष्णा श्रीराम(४२ वर्षे)असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. हा रक्तरंजीत खेळ सुरू असताना आजूबाजूची वाहतूक पूर्णपणे थांबली होती. भर चौकात खून होताना एकानेही सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. पत्नीचा आक्रोश भर चौकात सुरेश श्रीराम या तरुणाची हत्या झाली. पतीला मारल्याची माहिती मिळताच सुरेशची पत्नी पळत घटनास्थळी आली. रक्ताच्या थारोळ्यात भर रस्त्यावर सुरेशचा मृतदेह पडला होता. सुरेशची पत्नी मृतदेहाच्या बाजूला बसून किंचाळत होती. काळीज पिळटवून टाकणारा दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कुठे आणि कधी झाली हत्या?
१ मे – ठिकाण : उळे गाव, दक्षिण सोलापूर – संजय शिंदे यांची चाकू भोसकून हत्या
२ मे – ठिकाण : वैराग, बार्शी – दिनेश कापसे याची दगडाने ठेचून हत्या
२ मे – ठिकाण : बोरामणी, दक्षिण सोलापूर- गायत्री मस्के, प्रिया आणि शिवराज मस्के या तिघांची हत्या
३ मे – ठिकाण : ७० फूट रोड, सोलापूर शहर – सुरेश श्रीराम याची कोयताचे वार आणि दगडाने ठेचून हत्या.
बोरामणी तिहेरी खून प्रकरणी ५ जणांना ताब्यात
बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव शंकर उर्फ पप्पू म्हस्के असे असून तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. बीएनएस कलम १०३ (अ), ३५१ (२), ३, ५ यासह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृत प्रिया मस्के ही बारवीच्या वर्गात शिकत होती. तीने दिलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून तिला बारावी सायन्स शाखेतून ६८.८३ टक्के गुण मिळाले आहेत. निकाल पाहण्यापूर्वी प्रिया हिची क्रूर हत्या झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
















