अहमदपूर : रविकांत क्षेत्रपाळे
भाजपा सरकारने सर्वांसह शेतक-यांना अच्छे दिन येणार म्हणून स्वप्न दाखवले. अच्छे दिन येणार म्हणून कोपराला गुळ लावला पण नागरिक व शेतक-यांना अच्छे दिन दाखविण्याऐवजी भयंकर महागाईच्या खाईत लोटल्याचे दिसून येत आहे. जनता म्हणत आहे हे मायबाप सरकार अच्छे दिन नको आम्हाला पूर्वीचे कॉंग्रेस सरकारचे दिवस खूप चांगले असल्याचे सांगत आहे.
आज प्रत्येक वस्तूचे भाव गगनाला भिडले आहेत. पूर्वी थोड्या पैशात पिशवी भरून माल बाजारातून आणत होतो. आता पिशवी भरून रुपये घेऊन गेलो तरी पिशवीत आणलेला माल दिसत नाही. कापडे, किराणा साहित्य, चप्पल, वह्या, पुस्तके, पेन, बॅग, शाळेची फीस, प्रवास, हॉटेलचे खाणे, पेट्रोल, डिझेल, खते, बी -बियाणे, शेतीची अवजारे, फवारणीची औषधे, नांगरणी, पाळी, पेरणी करणे, दाढी कटिंग, वाहन खरेदी, कपडे शिलाई, बूट, चप्पल पॉलिश, रोजगार आदींसह सर्वच वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. सोन्याचे भाव तर विचारायची हिंमतच होत नाही. मग हे भाजपा सरकारचे अच्छे दिन म्हणायचे काय अशी चर्चा नागरिक करताना ऐकावयास मिळते आहे. देशाचे पंतप्रधान म्हणतात पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करा. सोने खरेदी करू नका. भावाच्या वाटणीमुळे शेतक-यांच्या जमिनीचे तुकडे पडले आहेत.
अनेकांकडे दोन ते पाच एकरपर्यंत जमिनी आहेत. अशा शेतक-यांना एक ते दीड लाखाचे बैल सांभाळण्यासाठी तसेच १ लाख साठ ते सत्तर हजारांचा सालगडी ठेवणे परवडत नाही. मग शेतक-यांनी जमीन नांगरायची कशी, पेरणी कशी करायची, देश दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाकडे वळत आहे. यासाठी ट्रॅक्टरला डिझेल शिवाय जमत नाही, डिझेल मिळत नाही आणि पंतप्रधान म्हणतात डिझेल वापरू नका. शेतक-यांनी शेती कशी करायची हे सरकारने सांगणे आवश्यक आहे. या सरकारने शेतक-यांची अवस्था मरू नये आणि वाचूही नये अशी वाईट करून ठेवली आहे.
शेतक-यांनी आपल्या शेतात सोयाबीन, तूर, कापूस आणि रब्बीमध्ये गहू ,हरभरा ,बडी ज्वारी, हायब्रीड ज्वारीची पेरणी केली होती. नांगरणी, कोळपणी, धसकट वेचणी, तुराटी वेचणी खर्च ,बी बियाणे, खते, फवारणीचे औषध, फवारणी करणे, सोयाबीन ,तूर कापणी करण्यासाठी गुत्ते देणे, रास करणे, वाहतुकीचा खर्च हे सर्व शेतक-यांनी केले. शेतीचा खर्च अधिक वाढला आहे आणि भाव कमी मिळाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान अधिक होत आहे. शेतक-यांनी भाव वाढेल म्हणून माल न विकता एप्रिलपर्यंत घरी ठेवला पण भाव वाढ झाली नाही. शेवटी घर प्रपंचाच्या अडचणीमुळे शेतक-यांना कमी भावात आपला माल विकून टाकावा लागला.
















