नांदेड : प्रतिनिधी
भावासोबतच्या शेतीच्या वादावरून नायगाव येथील भाजपचे आ.राजेश पवार, पत्नी पूनम पवार व इतर आठ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असे आदेश नायगाव प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आ. पवार अडचणीत आले आहेत.
नायगावचे भारतीय जनता पक्षाचे आ. राजेश पवार यांचे श्रीराम पवार हे चुलत बंधू आहेत. नायगाव मधील आलूवडगाव येथे पवार कुटुंबीयांची जमीन आहे. आ. राजेश पवार यांच्या आईकडून मिळालेली ही शेत जमीन आहे. या शेतीला लागूनच चुलत बंधू श्रीराम गोविंदराव पवार यांची जमीन आहे.
आ.राजेश पवार यांचे बंधू श्रीराम पवार हे अपंग आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतीमध्ये बांबूची लागवड केली. २४ जून २०२३ रोजी आ. राजेश पवार, पत्नी पूनम पवार व ८ जणांनी श्रीराम पवार यांना धमकी दिली होती. त्यामुळे श्रीराम पवारांनी पोलीस ठाणे, तहसीलदार,डीएसपी, जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. परंतु भाजप आमदार विरुद्ध कारवाई किंवा चौकशी करण्यास पोलीस प्रशासन तथा जिल्हा प्रशासन धजावले नाही.
कुठेच तक्रारीची दखल तथा न्याय न मिळाल्याने अपंग श्रीराम पवार यांनी नायगाव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन खटला दाखल केला. याबाबतची सर्व चौकशी केल्यानंतरच नायगाव प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आ.राजेश पवार, पत्नी पूनम पवार व इतर ८ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आमदाराच्या भावाला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाणे तहसील डीएसपी जिल्हाधिकारी तसेच न्यायालयात खेटे घालावे लागतात तर सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आ. राजेश पवार यांना मिळाला दिलासा
नायगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आ. राजेश पवार, पुनम पवार व इतर ८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी आ. पवार बिलोली सत्र न्यायालयात गेले होते. तेथे त्यांना बिलोली सत्र न्यायालयाने स्टे चा आदेश दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती जैसे थे अवस्थेत राहणार आहे.

