कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या नांदणी मठातील प्रसिद्ध ‘माधुरी’ हत्तिणीला वनताराला (गुजरात) नेऊन मंगळवारी (दि. २८ जुलै) १ वर्ष पूर्ण होत आहे. सर्वोच्च न्यायालय, राज्य सरकार आणि हाय पॉवर कमिटीने निर्णय देऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे माधुरी हत्तीला परत नांदणी मठात पाठवायला टाळाटाळ होत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आणि माधुरीच्या त्वरित घरवापसीसाठी २८ जुलैला आंदोलन होणार आहे. नांदणी निशिधिका या ठिकाणी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.
माधुरी हत्तीला कायदेशीर प्रक्रियेचा दाखला देत वनतारा इथं हलवलं होतं. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आणि संबंधित हाय पॉवर कमिटीने माधुरीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्याबाबत सकारात्मक निर्णय व परवानगी दिली आहे. असे असतानाही केवळ तज्ज्ञ समितीकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम अहवाल देण्यास जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि सीमाभागातील उत्तर कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
१७ सप्टेंबरला परमपूज्य प्रथमाचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची ७१ वी जयंती पहिल्यांदाच नांदणी गावात आणि मठात अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात साजरी होणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळ्यामध्ये माधुरी हत्तीची उपस्थिती असणे हा संपूर्ण जैन समाज आणि स्थानिक जनतेच्या अस्मितेचा व श्रद्धेचा विषय आहे.
















