नागपूर : प्रतिनिधी
सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात रेल्वे मार्गावर दोघांचा मृतदेह आढळला. मालगाडीच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की मृतांच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सापडले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन भाऊ नेहमीप्रमाणे शेतात शेताच्या कामासाठी जात होते. रेल्वे मार्गाच्या पलीकडे शेत असल्याने रेल्वे रूळ ओलांडून ते शेतात जात होते. याचदरम्यान भरधाव वेगात येणा-या मालगाडीखाली येऊन ते चिरडले गेले. ही घटना एवढी भीषण होती की, दोन्ही भावांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तर शीर धडापासून वेगळे झाले.
या धक्कादायक घटनेच्या आवाजाने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने सावनेर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मृत दोघेही शेताच्या दिशेने गेले होते.
मात्र रेल्वे रुळांवर ते कशा परिस्थितीत आले, हा अपघात होता की इतर कोणते कारण होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावरील सर्व अवयव गोळा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
















