बीड : प्रतिनिधी
आषाढी एकादशीची पंढरपूरची वारी पूर्ण करून भक्तिभावाने आपल्या गावी वाशिमला परतणा-या वारक-यांवर काळाने भीषण घाला घातला आहे. बीड जिल्ह्यातील केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात एका वृद्ध वारक-याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील वारी आटोपून वारकरी जीपने वाशिमकडे परतत होते. बीड जिल्ह्यातील साळेगावजवळ आले असताना जीप, ट्रॅक्टर आणि कार या तीन वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसून हा भीषण अपघात झाला.
अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गावक-यांनी याबाबत पोलिसांनाही तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. दुर्घटनास्थळावरील पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातात एका वृद्ध वारक-याचा दुर्दैवी अंत झाला. तर इतर ११ वारकरी व प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या कळंब आणि अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.
















