नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणा-या ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने ट्रकने एकापाठोपाठ ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ३ जणांचा जागीच मृत्यू, तर ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरून एक ट्रक जात होता. अचानक ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून जाणा-या कार, ट्रक तसेच इतर लहान-मोठ्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तब्बल ६ ते ७ वाहनांचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही वाहनांमधील प्रवासी आत अडकल्याने घटनास्थळी मदतकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले होते.
















