22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

लोकसभेआधी हरियाणात राजकीय भूकंप!

हरियाणा : लोकसभा निवडणुकीच्या आधी हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप आणि जननायक जनता पक्ष म्हणजे जेजेपी युती मोडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आता नवे सरकार स्थापन होणार आहे. जेजेपीचे तीन आमदार भाजपसोबत गेले असून इतर अपक्ष आमदारांच्या साथीने आता भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार आहे.

लोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्यावरून भाजपची जेजेपीसोबत असलेली युती तुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता हरियाणामध्ये भाजप स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मनोहरलाल खट्टर आता लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

भाजपकडे ४१ आमदार असून जेजेपीचे तीन आमदार आणि अपक्ष दोन आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला कोणतीही अडचण येणार नाही.

हरियाणातील पक्षीय बलाबल
हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आहेत. येथे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ४० जागा जिंकल्या होत्या. पण भाजपला बहुमत मिळाले नाही आणि त्यांनी जेजेपीसोबत युती करून सरकार बनवले. जेजेपीचे १० आमदार आहेत.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३१ जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा भव्य बिश्नोई विजयी झाला होता. अशा स्थितीत भाजपकडे ४१ आमदार होते. आता भाजपला स्वबळावर सरकार बनवायचे आहे. त्यांना अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. बहुमताचा आकडा ४६ आहे.

जेजेपी पक्ष फुटला
राजकीय गोंधळादरम्यान जेजेपीच्या दुष्यंत चौटाला यांनी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. जेजेपीचे १० आमदार आहेत, पण त्यापैकी तीन आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या तीनही आमदारांनी चौटाला यांच्या बैठकीला उपस्थिती लावली नव्हती.
दरम्यान, भाजप नायबंिसग सैनी यांना मुख्यमंत्री बनवणार असल्याची चर्चा आहे. ओबीसीतील सैनी समाजातून आलेले नायब सिंह हे हरियाणा भाजपचे अध्यक्ष आहेत.

हरियाणा विधानसभेतील स्थिती
भाजपा – ४१
भाजपासोबत असलेले अपक्ष- ६
हरियाणा लोकहित पार्टी – १ (भाजपाला पाठिंबा)
जेजेपी वेगळे झाल्यास भाजपाला पाठिंबा देणा-यांची संख्या- ४८
बहुमतासाठी लागणारा आकडा – ४६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR