31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeअंतरराष्ट्रीययुद्ध थांबले

युद्ध थांबले

२ आठवडे सशर्त युद्धविराम, इराण, अमेरिकेची सहमती
पाकिस्तान, चीनची
मध्यस्थी यशस्वी
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध तब्बल ४० दिवसांनंतर आज थांबले. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली असून, दोन्ही देशांनी २ आठवड्यांसाठी सैन्य कारवाया थांबविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही एक्सवर पोस्ट करून वृत्ताला दुजोरा दिला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी २ आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इराणने दिलेला १० अटींचा मसुदा मान्य करण्यासारखा असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती. या अटीला इराणनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण होर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुले करायला तयार झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबवण्यात चीन आणि पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेकडे एक सविस्तर प्रस्ताव पाठवला, जो आता अमेरिकन बाजू वाटाघाटीसाठी पुढे करणार आहेत. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात २ आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली असून १० एप्रिल रोजी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात चर्चा सुरू होईल.

यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करत अत्यंत विनम्रतेने मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसेच त्यांचे सहयोगी देश यांनी लेबनॉनसह इतर सर्वत्र तातडीने युद्धविराम करण्याबाबत सहमती दर्शविली. हा युद्धविराम त्वरित अंमलात येईल. मी या निर्णयाचे स्वागत करतो आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच सर्व वाद मिटवून एका निश्चित करारापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने पुढील चर्चा करण्यासाठी मी त्यांच्या शिष्टमंडळांना शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादला भेट देण्याचे निमंत्रण देतो, असे शाहबाज शरीफ यांनी पोस्ट करत सांगितले.

इराणवरील बॉम्बहल्ले
थांबविण्यास सहमत
ट्रम्प म्हणाले की, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे उघडण्यास सहमती दर्शवावी, अशी माझी अट आहे. मला इराणकडून १० कलमी प्रस्ताव मिळाला. वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

इराणच्या १० अटी
-अहिंसेप्रती कटिबद्धता
-होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम
-युरेनियम संवर्धनास परवानगी
-सर्व प्राथमिक निर्बंधांची समाप्ती
-सर्व दुय्यम निर्बंधांची समाप्ती
-संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
-गव्हर्नर्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे
-इराणला नुकसानभरपाई देणे
-पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्याची माघार
लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम

नेतन्याहू यांची कोंडी
अमेरिका-इराणची तात्पुरती युद्धबंदी पश्चिम आशियात राजकारणाला कलाटणी देणारी ठरली. इराणकडून १० अटी घालण्यात आल्यानंतर त्या चर्चायोग्य असल्याचे सांगत २ आठवड्यांची शस्त्रसंधी केली. या निर्णयामुळे युद्धखोर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांची मोठी राजकीय आणि लष्करी कोंडी झाली. निष्पाप लोकांची गाझापट्टी साफ केल्यानंतर लेबनॉनमध्येही तेच करत सुटलेल्या नेतेन्याहू यांचे करायचे काय, असा प्रश्न सतावण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR