29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeलातूररणरणत्या उन्हात प्रवासी वाहने सुसाट

रणरणत्या उन्हात प्रवासी वाहने सुसाट

लातूर : प्रतिनिधी
शाळानां सुट्या आहेत. काल लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानही पार पडले. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यांना एस. टी. महामंडळाच्या बसेने प्रवास करणे शक्य नाही, असे प्रवासी काळी-पिवळी, टमटम अशा प्रवासी वाहनांकडे वळतात. सध्या रणरणते उन्ह आहे. अशा परिस्थितीत प्रवासी वाहने सुसाट आहेत. प्रवासी क्षमतेसह वेग मर्यादेचे उल्लंघन सर्रासपणे होत असताना त्याकडे मात्र वाहतूक नियंत्रण पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे.

लातूर शहर हे व्यापारी व शैक्षणिक शहर आहे. संपुर्ण जिल्हा आणि तेलंगाना स्टेट, कर्नाटक सीमावर्ती भागातूनही असंख्य व्यापारी, नागरिक, रुग्ण लातूरला येतात. एस. टी. महामंडळाच्या बसेसची सोय असली तरी कधी कधी एस. टी. बस न मिळणे किंवा अन्य कारणाने प्रवासी खाजगी प्रवासी वाहूकीच्या वाहनांकडे वळतात. काळी-पिवळी, टमटमने प्रवास करणा-या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. सध्या लग्नसराईचेही दिवस आहेत. त्यामुळेही प्रवाशांची संख्या वाढली आहे. अशावेळी काळी-पिवळी आणि टमटम या वाहनांत प्रवासी क्षमतेपेक्षा प्रवासी बसवून वेग मर्यादेचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहन चालविले जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेची लाट लातूर जिल्ह्यात आहे. उन्हाचा कहर नागरिकांच्या जिवाची काहिली करीत आहे. अशा परिस्थितीत प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहनात कोंबून अतिवेगाने वाहने चालविली जात आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुर्दैवाने अपघातासारखी एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR