मुंबई : प्रतिनिधी
लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुळेंच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रकमेचे हस्तांतरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी सवाल उभा केला. इतक्या चाळण्या असताना पुरुष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे, असा थेट सवाल त्यांनी विचारला. राज्य सरकारने या घोटाळ्याची सामूहिक जबाबदारी घ्यावी असे त्या म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्र्यांवर आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणावरही खोटे आरोप करणार नाही. त्यामुळे त्यांच्या संशयाची सुई कोणावर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार परिषदेत सुळे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांनी थेट आकडाच समोर आणला. हा घोटाळा कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे. बँकेचा आहे की अन्य कुणाचा यावर काही सांगता येणार नाही. आता सरकारी गोटातून त्यावर काय प्रतिक्रिया उमटते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, डीबीटी, थेट हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे वळते होतात. त्यासाठी अनेक नियम आणि चाळणी प्रक्रिया आहे. एक-एक कागद तपासला जातो. आधार कार्ड, बँकेचे डिटेल्स तपासले जातात.
घोटाळ्याची जबाबदारी सरकारची
लाडकी बहीण योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा गेला. मग त्यावेळी पुरुषांच्या खात्यात पैसा जात आहे हे समोर आले नाही का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे डिजिटल इंडियाच्या कारभारावर त्यांनी थेट आक्षेप नोंदवला. डीबीटीतून पुरुषांच्या खात्यात पैसा वळता होणे म्हणजे डिजिटल इंडियाचे अपयश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सरकारने आता या घोटाळ्याची सामूहिक जबाबदारी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.