Homeलातूरलातूरच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना

लातूरच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना

लातूर : प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजनावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बुधवार दि. ११ मार्च रोजी उच्चस्तरीय अधिका-यांची बैठक घेण्यात आली. वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी विशेष वर्किंग कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महापौर जयश्री सोनकांबळे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, सभागृह नेते विजयकुमार साबदे, विरोधी पक्षनेते देविदास काळे, परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह अधिका-यांची उपस्थिती होती. सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनियंत्रित पार्किंग, चौकामधील गर्दी कमी करणे, अतिक्रमणे हटविणे व वाहतुकीला शिस्त लावणे यावर चर्चा झाली.
वाहतूक व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी यावेळी सर्वांनी सूचना मांडल्या. शहरात किमान १०० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करावी. कार्यरत नसलेले वाहतूक सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, ऑटोरिक्षा पॉईंट तसेच महानगरपालिकेच्या शहर वाहतूक बसचे नियोजन यावरही चर्चा झाली. प्रत्येक चौकापासून किमान ५० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग/हॉल्टींग झोन करावा, ऑटोरिक्षा, बस व सिटीबसचे थांबे निश्चित करावेत. विनापरवाना ऑटोरिक्षांना शहरात परवानगी देऊ नये. बेकायदेशीर पार्किंग विरोधात कारवाई करावी. नो पार्किंग फलक, झेब्रा क्रॉसिंग तसेच वाहतूक चिन्हे अंधुक झाली असून त्यांचे नूतनीकरण करावे. शहरातील प्रमुख रस्ते वनवे करावेत. वाहतूक नियमांबाबत अधिसूचना काढावी. फ्री लेफ्ट टर्न ही संकल्पना अंमलात आणावी. अतिक्रमणावर कारवाई करावी. मनप्राच्या अतिक्रमण विभागाला पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा.अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकावेत. रस्त्यावर थांबून प्रवासी घेण्याचे प्रकार बंद करावेत. चौकात मध्यभागी बांधलेल्या संरचना काढून टाकाव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
शहरातील राजीव गांधी चौकात राष्ट्रीय महामार्गावर भरणा-या भाजी बाजाराची व्यवस्था करावी, अशी सूचना देखील मांडण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त पंजाब खानसोळे, वसुधा फड, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, विधी अधिकारी, अतिक्रमण विभागासह सर्व क्षेत्रीय  अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR