लातूर : प्रतिनिधी
इस्लाममध्ये सर्वात पवित्र स्थळ असलेल्या मक्का, मदिना येथे हज २०२६ यात्रेसाठी हज कमेटी व खाजगी टूर्समार्फत लातूर जिल्ह्यातून जवळपास साडेपाचशेहून अधिक भाविक मागील ८ ते १० दिवसांत विविध टप्प्यात रवाना झाले आहेत. त्यांचा सुफा एज्युकेशन अॅन्ड सोशल वेल्फेअर सोसायटी अंतर्गत रहेनुमा-ए हज-कमिटी लातूर च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावर्षी हज यात्रेसाठी जाणा-या भाविकांना तेथील सर्वप्रकारची माहिती सुफा एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायाटी अंतर्गत रहेनुमा-ए-हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हज कमिटीच्या मार्गदर्शनात देण्यात आली. दरम्यान, यासाठी तीन टप्प्यात प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबीर, लसीकरण आदी उपक्रम राबविण्यात आले. तिस-या व शेवटच्या प्रशिक्षणात हज यात्रेकरूंना ऑनलाइन प्रक्षेपण द्वारे हज कमिटी महाराष्ट्र तर्फे खतिजा नाइकवाडे यांनी, मास्टर ट्रेनर हाफीज खुदबोद्दीन, तसेच प्रात्यक्षिकपणे हजरत मौलाना मुफ्ती हसनैन रमहानी मालेगाव, लातूर येथील मौलाना इसराईल रशिदी यांनी हज यात्रेची पध्दती, तेथील सुविधा आदींबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा हज प्रशिक्षक अमिरपाशा मणियार, अॅड. ईस्माईल शेख, एजाज तांबोळी, परवेझ यांनीही यात्रेकरूंना माहिती दिली. दरम्यान, पहिल्या टप्प्यात रवाना झालेल्या हज यात्रेकरूंचा सत्कार एमके फंक्शन हॉल येथे करण्यात आला. तसेच लातूरच्या रेल्वेस्थानकावरही हज यात्रेकरूंचा कमिटीच्या वतीने सत्कार करून प्रार्थना करण्याची सूचना करण्यात आली.
यावेळी सुफा एज्युकेशन अॅन्ड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमंद कामिल मणियार, सादीक आत्तार, इमरान शेख, सलीम मणियार, अॅड. रब्बानी बागवान, असद सय्यद, मौलाना शौकत अली , डॉ. रईसखान पठाण, शरीफखान पठाण, मुजम्मील शेख, अहद तांबोळी, लायक सौदागर, इमरान शेख, अर्शद देशमुख, हमीद शेख, हाफिज महेबूब, मजहर शेख आदीजण उपस्थित होते.
















