लॉर्डस् : वृत्तसंस्था
हरमनप्रीत कौरच्या भारतीय महिला संघाने लॉर्डसवर इंग्लडच्या महिला संघावर विजय मिळवत नवा इतिहास घडवला. क्रिकेटची पंढरी अशी ओळख लाभलेल्या लॉर्डसवर खेळवण्यात आलेल्या महिलांचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला. या कसोटी सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंडचा २७० धावांनी धुव्वा उडवला. या कसोटीत भारताने इंग्लंडला विजयासाठी ४५७ धावांंचे डोंगराएवढे आव्हान दिले होते. पण यजमान इंग्लंडला ते आव्हान पेलवले नाही. चौथ्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १८६ धावांमध्ये आटोपला. भारतीय महिलांच्या नावावरती वनडे विश्वचषक विजयानंतर आता लॉर्डसवर ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद झाली.
लॉर्डसच्या १४२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडला २७० धावांनी पराभूत केले. भारताने चौथ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ४५७ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताला पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुस-या डावात भारताने ३४१ धावांवर डाव घोषित केला होता. इंग्लंडचा तिस-या दिवशीच पराभव निश्चित झाला होता. कारण इंग्लंडने ५९ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. मात्र एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन यांच्या अर्धशतकामुळे इंग्लंडच्या विजयाचा आशा कायम होत्या. मात्र, संघ १८६ धावांपर्यंत पोहोचू शकला.
















