29.9 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्र‘वंचित’ने आता दिंडोरीत उमेदवार बदलला

‘वंचित’ने आता दिंडोरीत उमेदवार बदलला

दिंडोरी : माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिंडोरीच्या जागेची मागणी केली आहे. ही जागा आम्हाला सोडली नाही तर शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे दिंडोरी लोकसभा सध्या राज्यभर गाजत आहे. दिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे.

एकीकडे महायुतीत अजूनही काही जागांचे वाटप झालेले नाही. त्यात वंचितकडून उमेदवार बदलीचा खेळखंडोबा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत दिंडोरी लोकसभेचा समावेश होता. मात्र अचानकपणे प्रकाश आंबेडकरांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे.

वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार दिंडोरीतून देण्यात आला आहे. आता वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

दिंडोरीत तिरंगी लढत
दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून डॉ. भारती पवार, शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR