मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चाआधी ही नोटीस मिळाल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
गडचिरोली येथे सोमवारी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. गडचिरोली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश सावकर पो-रेड्डीवार, कविता पोरेड्डीवार, विजय गोरडवार, माजी जिल्हा परिषद सदस्य लालसू पोगती आणि शिवसेनेचे गजानन नईअम यांनी शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये दाखल झाले. या कार्यक्रमात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.
ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी नागपुरात मोठ्या मेळाव्याची घोषणा केल्यानंतर लगेचच आयकर नोटीस बजावण्यात आली, लोकांसाठी उठवलेला आवाज दाबण्यासाठी सरकार त्यांच्या एजन्सींचा गैरवापर करत आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ही नोटीस म्हणजे ओबीसी आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी उभे राहणा-यांना धमकावण्याचा स्पष्ट प्रयत्न आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला. तसेच शेतकरी, आदिवासी आणि कामगार वर्गाच्या न्यायासाठी आम्ही लढत राहू, असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
कृषी संकटावरही सरकारवर टीका
कृषी संकटाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांना कर्जमाफीशिवाय जगावे लागत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या एलआयसी बचतीचा वापर करून त्यांच्या उद्योगपती मित्रांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

