धाराशिव : प्रतिनिधी
आज जग वेगवान झाले आहे. टीव्ही, सोशल मीडिया यामुळे बातम्या तात्काळ मिळत असल्या तरी स्थानिक बातम्यांसाठी आणि स्थानिक लोकांच्या भावभावनांना, प्रश्नांना आणि आशा-आकांक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थानिक वृत्तपत्रांची गरज असते. एकमत हे काम अत्यंत निष्ठेने व सचोटीने करीत आहे. आपल्या भागातील माध्यम (दैनिक) म्हणून आपण वाचकांनी एकमतला आजवर जसे बळ दिले, तसेच बळ यापुढेही दिले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक, विचारवंत पन्नालाल सुराणा यांनी केले.
एकमतच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त धाराशिव येथे रविवारी आर्यन फंक्शन हॉल येथे स्नेहमेळावा व कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश डोंग्रजकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रवीण स्वामी, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, रुईभर येथील आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष कोळगे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष नितीन तावडे, एकमतचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी मच्छिंद्र कदम आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, उद्योजक, व्यावसायिक, प्रशासन, महिला सक्षमीकरण आदी क्षेत्रांतील ५७ गौरवमूर्तींना कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला.
पन्नालाल सुराणा पुढे म्हणाले की, अलीकडे मुख्य बातम्या टीव्हीवर ऐकायला मिळतात. त्यामुळे दैनिकाचे महत्व कमी झाले असे वाटत असले तरी वृत्तपत्र वाचावे वाटते. कारण यामध्ये आपल्या भागातील बातम्या वाचायला मिळतात. आपल्या भागात काय चालले याची आपुलकी असते. त्यातच वाचकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी वृत्तपत्रे हवी असतात. त्यातल्या त्यात आपल्या भागातील माहिती, घडामोडी याची माहिती व्हावी, यासाठी समाजातील चांगल्या वाचकांनी आपल्या भागातील वृत्तपत्रे चालावीत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वाचकांचा पाठिंबा असेल तरच चालवणा-यांचा हुरुप वाढतो. त्यासाठी आपण त्यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा, त्यासाठी जमेल तेवढे प्रयत्न करावेत. यावेळी शिक्षण महर्षी सुभाष कोळगे, नितीन तावडे यांनीही मार्गदर्शन करून दैनिकास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र कदम यांनी केले. सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार एकमतचे कळंब तालुका प्रतिनिधी सतीश टोणगे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.
मातीतल्या माणसांशी ‘एकमत’ची नाळ कायम
अध्यक्षीय समारोपात एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांनी एकमतने ३४ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करीत ३५ व्या वर्षात पदार्पण केले. हा कोणत्याही वृत्तपत्रासाठी मैलाचा दगड आहे. एकमतसाठी तो विशेष आहे. कारण लातूरसारख्या निमशहरी, ग्रामीण भाग असलेल्या ठिकाणी लोकनेते विलासराव देशमुख यांनी एकमत सुरू करून छ. संभाजीनगर, सोलापूरसह पुण्यापर्यंत एकमतच्या आवृत्या सुरू केल्या. हा खरे तर प्रवाहाविरुद्ध जाण्याचा धाडसी निर्णय होता. परंतु लोकनेते विलासराव देशमुख यांचे भक्कम पाठबळ आणि त्यांच्या पश्चात देशमुख कुटुंबीय कायम एकमतच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे एकमतने अनेक संकटे झेलत ३४ वर्षांचा काळ यशस्वीरित्या पूर्ण केला आणि आज एकमतचा वटवृक्ष झाला. लोकनेते विलासराव देशमुख यांनी सामाजिक बांधिलकीचा मूलमंत्र दिला. तोच आदर्श डोळ््यासमोर ठेवून वाटचाल केल्याने ३४ वर्षांनंतरही एकमतची या मातीतल्या लोकांशी नाळ कायम घट्ट राहिली. एवढेच नव्हे तर वृत्तपत्रासोबत दैनिक एकमत डॉटकॉम आणि आता डिजिटल एकमतच्या माध्यमातून एकमतने लोकल टू ग्लोबल अशी मोठी झेप घेतली. आज जगभरातील दीड लाखाहून अधिक लोक रोज हे दैनिक वाचत आहेत, असे म्हटले.