नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या शुल्कात मोठा बदल केला असून काही वाहनांसाठी ही फी पूर्वीच्या तुलनेत तब्बल १० पट वाढली आहे. हा बदल सेंट्रल मोटर व्हेइकल रुल्सच्या फिफ्थ अमेंडमेंट अंतर्गत करण्यात आला असून तो तात्काळ लागूही झाला आहे.
पूर्वी १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तरच फिटनेस टेस्टसाठी जास्त फी आकारली जात होती. मात्र नवे नियम लागू झाल्यानंतर गाडी १० वर्षांची झाली की वाढीव फी लागू होईल. नवीन व्यवस्थेनुसार गाड्यांना १० ते १५वर्ष, १५ ते २०वर्ष, २० वर्षांपेक्षा जास्त अशा तीन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. हे नवे शुल्क दोन चाकी, तीन चाकी, एलएमव्ही, मीडियम आणि हेवी व्यावसायिक वाहनांसह सर्व वाहनांवर लागू आहेत. याचा सर्वाधिक फटका कमर्शियल वाहने वापरणा-यांना बसणार आहे.
…………………..
२० वर्ष जुन्या वाहनांसाठी फी
– २० वर्ष जुने ट्रक/बस : २,५०० – २५,००० रुपये
– २० वर्ष जुने मीडियम कमर्शियल वाहन : १,८०० – २०,००० रुपये
– २० वर्ष जुने एलएमव्ही : १५,००० रुपये
– २० वर्ष जुनी ऑटोरिक्षा : ७,००० रुपये
– २० वर्ष जुनी मोटरसायकल : ६०० – २,००० रुपये
…………………………..
१५ वर्षांखालील वाहनांसाठी फी
– मोटरसायकल : ४०० रुपये
– लाइट मोटर वाहन : ६०० रुपये
– मीडियम/हेवी कमर्शियल वाहन: १,००० रुपये
सरकारचा दावा आहे की, जुनी, प्रदूषणकारक वाहने रस्त्यावरून कमी व्हावीत, वाहनांची नियमित तपासणी व्हावी, रस्ते अपघात कमी व्हावेत. यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. मात्र, वाहनधारकांच्या मते ही वाढ मोठे आर्थिक नुकसान करणारी आहे. विशेषत: ज्यांच्याकडे १० वर्षांची जुनी गाडी आहे त्यांना आता फिटनेस टेस्टसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

