बुलडाणा : बुलडाण्यातील राजकारणात महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी गायकवाड यांच्या अटकेची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी प्रथमच या प्रकरणावर प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आपल्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले. बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय संघर्षाची किनार मिळाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करत आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला. जिल्ह्यात दरोडे आणि चोरीच्या घटना वाढल्याचा दावा त्यांनी केला. या मुद्द्यांविरोधात शिवसेना उद्यापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाच्या वाढदिवसाच्या आयोजनावरूनही गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केले. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून नागरिकांना अडथळा निर्माण करण्यात आला आणि त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
गायकवाडांना दुष्काळाची आठवण
एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला. अधिका-यांना राजशिष्टाचाराचे पालन करावे लागते; मात्र त्याचे पालन होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणी लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. दोन्ही पक्ष महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवरील या संघर्षामुळे महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
महायुतीत संघर्ष अधिक तीव्र होणार
विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर गायकवाड यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि फडणवीसांवर केलेले आरोप यामुळे हा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी कायदेशीर कारवाईचा वापर होत असल्याची चर्चा बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाली आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधितांकडून स्वतंत्र प्रतिक्रिया येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
















