रायपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामना रंगला.
रायपूरमधील येथे झालेल्या लढतीत आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १९२ धावा केल्या. १९३ धावांची लक्ष्यप्राप्ती करताना आरसीबीच्या संघाने १९४ धावा केल्या आणि सामना ६ विकेट्सने जिंकला. यामुळे आता गुणतालिकेत मोठे बदल दिसत आहेत.
आरसीबीच्या या विजयामुळे आरसीबीचे १२ सामन्यांत १६ गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. गुजरात टायटन्सचेही १६ गुण आहेत, पण आरसीबीचा नेट रन रेट चांगला आहे. दरम्यान, केकेआर ११ सामन्यांत ९ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. उर्वरित सामने जिंकून ते फार तर १५ गुणापर्यंत पोहोचू शकतात. सध्याची गुणतालिका पाहता १५ धावा प्लेऑफसाठी पुरेशा ठरणार नाहीत. त्यामुळे केकेआरचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. शिवाय सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडे १४ गुण आहेत तर पंजाब किंग्जच्या संघाकडे १३ गुण आहेत.
मागील दोन सामन्यांमध्ये विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. मात्र, या सामन्यात त्याने जोरदार फलंदाजी केली. वैभव अरोराच्या दुसऱ्या षटकात चार चौकार मारून त्याने आपला इरादा स्पष्ट केला. त्याने ५८ चेंडूंमध्ये आपले ९ वे आयपीएल आणि १० वे टी-२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. विराट १०५ धावांवर नाबाद राहिला. यादरम्यान, विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या १४ हजार धावा देखील पूर्ण केल्या.
















