परभणी : गंगाखेड शहरातील मोंढा परिसरात दुकाने बंद करण्यास भाग पाडत व्यापा-यासह मुनीमाला मारहाण केल्याची घटना दि. ११ जुलै रोजी सकाळी घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश बिडगर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित मोर्चा दरम्यान सकाळी ११.३० वाजता घोषणा देत १० ते १५ जण मोंढा परिसरात आले. त्यांनी वैष्णवी कृषी सेवा केंद्राचे चालक दिगंबर सोपानराव चोरघडे व त्यांचे मुनीम रावसाहेब बिसमिल्ले यांना दुकान बंद करण्यास सांगितले.
यावेळी काही जणांनी शेजारील हनमंत तुळशीराम जाधव यांच्या दुकानासमोर गोंधळ घालत दुकान बंद करण्यास सांगितले. त्यानंतर दुकानातील मुनीम मुंजाभाऊ उर्फ बाळू गंगाधर जाधव यांना लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. मुंजाभाऊ यांना सोडविण्यासाठी गेलेल्या चोरघडे यांनाही एका व्यक्तीने उजव्या हातावर व चेह-यावर मारहाण केली. त्यानंतर इतरांनीही लाथा, बुक्यांनी व लोखंडी रॉडने दोघांना मारहाण केली. दुकानातील मोटार पाईपलाइनचे अंदाजे ५ ते ७ हजार रुपयांचे साहित्याचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिगंबर चोरघडे (रा. धारखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोपान पांडुरंग पवार (रा. सायळा (सु.), ता. गंगाखेड) याच्यासह अन्य ६ ते ७ जण अशा एकूण ८ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
















