लातूर : प्रतिनिधी
बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करण्यासाठी शहरात कार्यरत असणारी टोइंग व्हॅन काही दिवसांसाठी स्थगीत करण्याचा निर्णय मनपाच्या वतीने घेण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मनपा कार्यालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीस मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक शिवाजीराव जवळेकर, युनूस मोमीन, मनपा उपायुक्त वसुधा फड, डॉ. पंजाबराव खानसोळे, वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज जिरगे, शहर अभियंता उषा काकडे, विद्युत विभाग प्रमुख जे. एम. ताकपिरे, अतिक्रमण विभाग प्रमुख समाधान सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. त्यात दयानंद महाविद्यालय परिसरातील हातगाडे काढणे, जप्त केलेली वाहने रस्त्यावर न ठेवणे, सर्व सिग्नल्स वापरात घेणे, प्रत्येक चौकातील फ्री लेफ्ट योजना कार्यानित करणे, बार्शी रोडवरून येताना पीव्हीआर चौकातील टपरी हटवणे, मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावरील पार्किंग संदर्भात असणा-या तक्रारींबाबत कारवाई करणे, याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांत दयानंद महाविद्यालय परिसरातील हातगाडे हटविण्यात आले. टोइंग व्हॅन काही दिवसांसाठी स्थगीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पीव्हीआर चौकातील दूध विक्री केंद्राची टपरी हटवण्यात आली आहे. शहरात इतरही उपाययोजना करण्यात येत आहेत.
















