मुंबईत ट्रिपल इंजिन सरकार आणा, विरोधकांचा सुफडा साफ करा : शाह 
मुंबईवर २ व्यापा-यांचा डोळा, परंतु मुंबईत भगवा फुटणार नाही : ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी
कधीकाळी महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर असलेला भाजप आज क्रमांक एकचा पक्ष झाला. पक्षाला आता कोणाच्याही कुबड्या घेऊन चालण्याची गरज राहिलेली नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मित्रपक्षांना सूचक इशारा दिला. केंद्रात आणि महाराष्ट्रात आज भाजपची सत्ता असली तरी विकासासाठी ट्रिपल इंजिन सरकार आणण्याचा निर्धार बोलून दाखविला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत विरोधकांचा सूपडा साफ करावा, असे म्हटले. दरम्यान, ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २ व्यापा-यांचा मुंबईवर डोळा आहे. परंतु तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी भगवा फुटणार नाही, अशा शब्दांत प्रतिआव्हान दिले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने चर्चगेट परिसरात पक्ष कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शाह बोलत होते. आज महाराष्ट्र भाजप कोणाच्या कुबडयांवर नाही तर स्वबळावर वाटचाल करत आहे. २०१४ पर्यंत भाजप हा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता. आज तो प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तीन वेळा पक्षाने विजय मिळविला. केंद्राप्रमाणे आता महाराष्ट्रातही भाजप एक महत्वाचा पक्ष आहे. आज देशात पक्षाचे ६६० संघटनात्मक जिल्हे आहेत. त्यापैकी ३७५ जिल्ह्यात कार्यालये आहेत. महाराष्ट्रात देखील काही जिल्हे उरले असून डिसेंबर २०२६ पर्यंत तेथे कार्यालये उभारा, अशी सूचना शाह यांनी केली.
देशात आता कुटुंबाचे
राजकारण चालणार नाही
देशात आता कुटुंबाचे राजकारण चालणार नाही. तर ज्यात क्षमता आहे, त्या नेत्याचेच राजकारण चालेल. जे पक्ष पक्षांतर्गत लोकशाही राबवू शकत नाहीत ते देशाची लोकशाही काय वाचविणार? असा सवाल करत शाह यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला.
भाजप काचेच्या घरात 
राहत नाही : फडणवीस
भाजपचे कार्यालय हे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे घर असते. प्रदेश भाजपच्या या नवीन कार्यालयाची जागा स्वखर्चाने विकत घेऊन, महापालिकेचे सर्व नियम पाळून, नियमात कुठलीही सूट न घेता खरेदी करण्यात आली आहे. भाजप काचेच्या घरात राहात नाही. तेव्हा दगड फेकू नका. जागा बळकावण्याची सवय जडलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
मुंबई आम्हीच जिंकणार : ठाकरे
अमित शाहांना मी आव्हान देतो. तुम्ही मुंबईत येऊन गेले. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करायचे ते करा, कितीही डोके आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच शिवरायाच्या मावळ््याला कुणी डिवचायचे नाही. डिवचले तर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे म्हणत भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्हीच मुंबई पालिकेची निवडणूक जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईवर दोन व्यापा-यांचा डोळा आहे. आज ऍनाकोंडा म्हणजे सर्व गिळणारा साप येऊन गेला, त्यांना मुंबई गिळायची आहे, पण ते मुंबई कशी गिळतात ते बघतोच, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शाह यांना आव्हान दिले.

