औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील शेतक-यांना सरसकट पीकविमा मंजूर करावा, सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे नेते श्रीशैल्य उटगे, औसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण बाबळसुरे, नारायण लोखंडे, दत्तोपंत सूर्यवंशी, अॅड. शाहनवाज पटेल, अनीस जहागिरदार, अॅड. फैय्याज पटेल, नियामत लोहारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. २०२५ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी तालुक्यातील शेतक-यांनी नियमानुसार पीकविमा भरला होता. मात्र भादा महसूल मंडळ वगळता इतर बहुतांश महसूल मंडळांतील शेतक-यांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भादा महसूल मंडळाप्रमाणेच उर्वरित सर्व महसूल मंडळांतील पात्र शेतक-यांना तात्काळ सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हिताच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी भूमिका औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मांडण्यात आली.
















