बिहारची राजधानी पाटणा येथील पाटलिपुत्र रेल्वे स्टेशनवर परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला आहे. बिहार पोलीस मद्यनिषेध विभागाच्या भरती परीक्षेसाठी निघालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी गाड्यांचा तुटवडा आणि ट्रेन उशिरा आल्यामुळे संतापून रेल्वे ट्रॅक रोखले, गाड्यांची तोडफोड केली आणि जोरदार दगडफेक केली. या हिंसाचारात रेल्वे आयजी जितेंद्र राणा यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
पाटलीपुत्र बिहार : बिहार पोलिसांच्या मद्यनिषेध विभागाची परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी बिहारमधील विविध जिल्ह्यांतून हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी पाटलिपुत्र स्टेशनवर पोहोचले होते. मात्र, परीक्षा विशेष ट्रेन्सची संख्या कमी असणे आणि असलेल्या गाड्या प्रचंड उशिराने धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा हुकण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी रेल्वे रुळांवर उड्या मारून गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प केली.
काही वेळातच या आंदोलनाला हिंसक वळण लागले. विद्यार्थ्यांनी स्टेशन परिसर आणि एक्झाम स्पेशल ट्रेनवर प्रचंड दगडफेक केली. ट्रेनच्या काचा फोडण्यात आल्या असून रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच आंदोलकांकडून पुन्हा दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोहोचलेले रेल्वे आयजी जितेंद्र राणा आणि इतर अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले.
हजारो विद्यार्थ्यांचा वाढता संताप आणि बेकाबू झालेली परिस्थिती पाहता पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी तीन राउंड हवेत गोळीबार केला. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांना रुळांवरून हटवण्यासाठी सौम्य लाठीमारही करावा लागला. रेल्वे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली आणि परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचवता यावे यासाठी विशेष गाड्यांची आणि पर्यायी वाहतुकीची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या वाहतुकीची हमी दिल्यानंतर अनेक तासांच्या गोंधळानंतर रेल्वे ट्रॅक रिकामा करण्यात आला आणि रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
















