लातूर : प्रतिनिधी
जन्माला येऊन अवघे तीन दिवस झालेले बाळ जन्मजात श्वासपटलाच्या दोषामुळे श्वास घेण्यासाठी झुंजत होते. अशा गंभीर परिस्थितीत लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी अवघ्या तीन मिलिमीटरच्या छिद्रातून दुर्बिणीद्वारे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. मराठवाड्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बाळावर अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच झाल्याचे सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेडीयाट्रीक लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संजय पौळ-पाटील यांनी ही शस्त्रक्रिया केली. बाळामध्ये जन्मजात श्वासपटलाचा दोष असल्याचे गर्भावस्थेतच निदान झाले होते. या विकारात श्वासपटलामध्ये दोष निर्माण झाल्याने पोटातील आतडी व इतर अवयव छातीच्या पोकळीत जातात. त्यामुळे फुफ्फुसांच्या वाढीवर परिणाम होऊन जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास गंभीर अडचण निर्माण होऊ शकते. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवून प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. मेघराज चावडा, डॉ. गणेश स्वामी आणि भूलतज्ज्ञ डॉ. शिरसाट यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर अतिदक्षता विभागात बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय कुसुंबीवाल, डॉ. किरण होळीकर आणि डॉ. विकास साळुंखे यांनी बाळाची देखरेख व उपचार केले. ही अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती. मात्र बालशल्यचिकित्सक डॉ. संजय पौळ-पाटील आणि सहभागी वैद्यकीय पथकाने ती अत्यंत कौशल्याने यशस्वी केली आणि चिमुकल्याला जीवदान दिले. लातूरमध्ये उपलब्ध असलेल्या सुपरस्पेशालिटी सुविधांमुळे हे शक्य झाले. लातूरच्या शासकीय रुग्णालयात ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मराठवाड्यातील बालरुग्णांना उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे, असे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते-पाटील म्हणाले.
पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत दुर्बिणीद्वारे अत्यंत लहान छिद्रांतून शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे मोठी जखम, रक्तस्त्राव आणि संसर्गाचा धोका कमी होतो. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती लवकर सुधारण्यास मदत होते. औषधोपचाराचा कालावधी कमी होऊन बाळाला लवकर दूध सुरू करता येण्याची शक्यता असते. तसेच मोठ्या चि-याचा व्रण राहत नसल्याने भविष्यातील सौंदर्यात्मक परिणामही चांगले राहतात, असे डॉ. संजय पौळ-पाटील यांनी सांगितले.
















