लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील विविध भागांतून गहाळ अथवा हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी लातूर शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, मोबाईलच्या तांत्रिक तपासासह सातत्यपूर्ण पाठपुरावा करून लातूर शहर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांनी तब्बल ५९ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळविले आहे. हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल फोन सोमवारी, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. मोबाईलमध्ये वैयक्तिक माहिती, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, छायाचित्रे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती तसेच अनेक आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतात. त्यामुळे मोबाईल हरवल्यानंतर संबंधित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविलेल्या गहाळ मोबाईलच्या तक्रारींची दखल घेत लातूर शहर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून त्यांचा शोध घेण्यास प्राधान्य दिले. या विशेष मोहिमेदरम्यान मोबाईल फोनचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्यात आला. विविध माध्यमांतून माहिती संकलित करून संबंधित मोबाईलचा मागोवा घेण्यात आला. त्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने अनेक दिवसांपासून हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस ठाणेनिहाय करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीतील १९ मोबाईल, पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील १५ मोबाईल, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीतील १५ मोबाईल, पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील १० मोबाईल, असा एकूण ५९ मोबाईल फोन शोधून हस्तगत करण्यात आले.हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल फोन दि. ०१ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त करीत लातूर शहर पोलिसांचे आभार मानले.
ही मोहीम केवळ हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यापुरती मर्यादित नसून, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्यांना तातडीने मदत करण्याच्या लातूर पोलिसांच्या बांधिलकीचे उदाहरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही पोलीस दल तितक्याच तत्परतेने पार पाडत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. लातूर शहरातील नागरिकांनी आपला मोबाईल हरवल्यास अथवा गहाळ झाल्यास तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी तसेच आवश्यक ती माहिती पोलिसांना उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. अमोल तांबे, यांच्या निर्देशांवर पोलीस अधीक्षक, लातूर श्री. मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांच्या नेतृत्वाखाली श्री. अक्षय जाधव, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस अंमलदार लक्ष्मण कांदे, अक्षय डिगोळे, पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर, पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक सुनिल रेजीतवाड व पोलीस अंमलदार योगेश चिंचोलीकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
















