बुलडाणा : प्रतिनिधी
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून पुन्हा वाद पेटला आहे. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिव्यांची लाखोली वाहिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
काँम्रेड गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लोकप्रिय आहे. त्यावरून यापूर्वीही वाद पेटला होता. आ. संजय गायकवाड यांनी या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ केली आणि धमकी दिली. या क्लिपवरून आणि पुस्तकावरून पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर दाखवताना आ. संजय गायकवाड यांचा तोल गेल्याचे दिसते. या ऑडिओ क्लिपमध्ये ते शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला याविषयी प्रकाशक प्रशांत आंबी यांना जाब विचारत आहेत. त्याचवेळी शिव्यांची लाखोली वाहत आहेत. तर जीभ हासडण्याची भाषाही या ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्टपणे ऐकू येते. तर प्रशांत आंबी हे त्यांना व्यवस्थित बोलण्याची विनंती करतानाच संताप व्यक्त करताना ऐकू येतात.
शिवाजी महाराजांविषयी एकेरी शब्दाचा प्रयोग केला. मी त्यांना हे योग्य वाटते का असे विचारले. त्यावेळी प्रशांत आंबी मला वेड्यावाकड्या भाषेत बोलले. आम्ही सर्व सहन करू शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधी सहन करू शकत नाही. पानसरे आज हयात आहेत का, त्याने वर जाऊन त्यांना विचारले का? ब्राह्मण आहे म्हणून तुम्ही मला असे म्हणत आहात का? असे त्यांनी मला विचारले. मी त्यांची जात काढली नाही. अशा लोकांना शिव्याच नाही तर जीभही हायडायला हवी. इतका मोठा अपमान करून सुद्धा त्यांची मगरुरीची भाषा दिसली. त्यामुळे मी त्यांना झापले.
प्रशांत आंबी यांची तीव्र प्रतिक्रिया
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जे शीर्षक आहे, त्यावरून त्यांनी वाद घातला. जवळपास ९ मिनिटे आम्ही बोललो. त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या नावात जे जी आहे. ते आदरार्थीच आहे आणि हा एकेरी उल्लेख नाही. तरीही ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. या नऊ मिनिटांत ते मला अश्लील भाषेत शिवीगाळ करत होते. त्यानंतर ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते.

