नांदेड : प्रतिनिधी
राज्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विविध जिल्ह्यात रस्त्यावर वाहनांची येजा वाढली आहे. या वाहतुकीदरम्यान अपघातही वाढले आहेत. नांदेडमध्येही भीषण अपघाताची घटना घडली आहे. नांदेडच्या हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकीला धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच अपघाती मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री दहा वाजता ही दुर्घटना घडली. दोन दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. अपघातात दुचाकीवरील आई, मुलगा आणि आत्या असे तिघे जण ठार झाले. तर दुस-या कुटुंबातील एक जण ठार झाला. या अपघाताने हडसनी फाट्याजवळ एकच खळबळ उडाली.
निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाई लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता. हडसनी गावाजवळ येताच भरधाव वेगातील कार आणि दुसरी एक दुचाकीसोबत भीषण धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेजण दूरवर फेकल्या गेले. या धडकेत आई, मुलगा आणि आत्याचा मृत्यू झाला. दुस-या दुचाकीवरील एकजण आणि कारमधील एकजण असे दोघे गंभीर जखमी झाले. जखमीवर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

