बीड : जिल्हा कारागृहात पुन्हा एकदा कराड गँगची दहशत चर्चेमध्ये आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. जेलमध्ये घडलेला प्रकार कैद्याकडून दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची एक कथित ऑडिओ क्लीपदेखील व्हायरल झाली आहे. या संदर्भात जेल प्रशासनाकडून मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली, मात्र कैद्याने कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले, अशी माहिती जेल प्रशासानकडून देण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांचा खून करणा-या कराड गँगची दहशत तुरुंगातही सुरू असल्याची क्लीप व्हायरल झाली आहे. बसण्याच्या जागेच्या वादातून प्रतीक घुले आणि सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केली आहे. धक्कादायक म्हणजे आधीच्या जेलरची बदली करून आत्ताचा जेलर पण आम्हीच आणला आहे, आमचे इथे कोणीच काही बिघडू शकत नाही, मनोज जरांगे यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्लॅनही शिजलाय, असा उल्लेखही या क्लीपमध्ये आहे. दरम्यान ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यावर आता मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमके काय म्हणाले जरांगे?
व्हायलर क्लीप समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. गोळ्या घालायचे लांब राहिले, तू फक्त मला बघून जा असे थेट आव्हानच जरांगे यांनी दिले आहे. तू गोळ्या घालायला फक्त इथे येच त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तेव्हा तुला कळेल. आमचा समाज ही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडणे कशाला म्हणतात हे आणखी एकदा संपूर्ण भारत बघेल, तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे आणि मुंडके एकीकडे झालेले तुला दिसेल, तू मला फक्त गोळ्या घालूनच दाखव. आमच्याकडेही गोळ्या आहेत. तुम्ही जर गोळ्या घालून आमची लोक मारणार असाल तर आमच्याकडे कु-हाडी आहेत. मी मराठ्यांना संयम ठेवायला सांगतो पण तुमची मस्ती अशीच राहीली तर मग काही खरे नाही, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी दिला आहे.

